बँकेच्या शेजारीच लागली आग, मोठा अनर्थ टळला !
हिंगोली शहरातील फलटण परिसरात (पीपल्स बँकेच्या पाठीमागे) अचानक आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. याबाबत नगर पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे काही टपरीधारक दुकान चालकांचे साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदल वाहनचालक अब्दुल रहेमान तसेच रघुनाथ बांगर यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धावून आग आटोक्यात आणली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरात अचानक आगीची घटना घडल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. लागलेल्या आगीत एका पत्र्याच्या दुकानातील टेलरिंग काम करणाऱ्या व्यावसायिकांचे कापडासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे.सदरील प्रकार हा शहरातील पीपल्स बँकेच्या पाठीमागच्या बाजूला लागूनच घडला आहे.